धक्कादायक ! ‘कोरोना’ संकटात पिंपरीमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा टॅम्पो पळवला

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना संकट काळात ऑक्सिजनला मोठी मागणी असून वेळेवर ऑक्सिजन न मिळालाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना चाकणमध्ये चोरट्यांनी हॉस्पिटलला पुरवठा करण्यात येणाऱ्या 12 ऑक्सिजन सिलिंडरची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चाकण-म्हाळुंगे परिसरात नुकतीच ही घटना घडली असून चोरट्यांनी ऑक्सिजन सिलिंडरचा टेम्पोच पळवून नेला आहे.

याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोचे चालक-मालक असलेले बाबुलाल बिसाजी चौधरी (वय-52 रा. म्हाळुंगे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी हे म्हाळुंगे भागातील दोन-तीन कंपन्यांत तयार होणारा ऑक्सिजन सिलिंडरद्वारे विविध हॉस्पिटलमध्ये पुरवठा करण्याचे काम करतात. बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस त्यांनी काही सिलिंडर हॉस्पिटलमध्ये नेऊन दिले.त्यानंतर उरलेले 12 भरलेले सिलिंडर आणि 7 रिकामे सिलिंडर असलेला टेम्पो त्यांनी घराच्या बाहेर लावला. गुरुवारी पहाटे दोन ते सकाळी आठ या कालावधीत चोरट्यांनी टेम्पो चोरून नेला.

कोरोनामुळे एमआयडीसी भागातील कंपन्यांना उत्पादनाच्या 20 टक्के तर हॉस्पिटलसाठी 80 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहे. सध्या अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत असून, अशातच सिलिंडर चोरीला जाण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. म्हाळुंगे चाकण पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.