Pune : लोहगाव परिसरात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, डोक्यात दगड घालून केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खुन करण्यात आल्याचा प्रकार लोहगाव येथे उघडकीस आला आहे. तिची ओळख पटू नये म्हणून चेहर्‍यावर दगड टाकून खुन करण्यात आला आहे.

लोहगाव येथील कुबेर पार्कसमोरील डी. वाय. पाटील कॉलेज रोडवर मोकळ्या जागेत एका मृतदेह पडला असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका 35 वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या अंगावर मोरपंखी रंगाचा गाऊन असून तिची उंची ५ फुट आहे. तिच्या डाव्या हाताचे अंगठ्याजवळ S A असे इंग्रजीत गोंदलेले आहे. कोणीतरी डोक्यात मोठा दगड टाकून तिचा खुन करुन तिची ओळख पटू नये, म्हणून चेहरा छिन्नविच्छिन्न करण्यात आला आहे. या घटनेला आता एक दिवस उलटल्यानंतरही अजून या महिलेची ओळख पटू शकलेली नाही. विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.