Pune : हडपसरमधील कॅनॉलमध्ये महिला अन् पुरूषाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, पोलिस तपास सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसरमधील कॅनॉलमध्ये महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. भल्या सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी हे मृतदेह बाहेर काढले आहेत. यात महिलेची ओळख पटली आहे.

आज्ञा काळुराम घोडेस्वार (वय ५२, रा. शिंदे वस्ती, शंकर मंदिराजवळ, हडपसर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात AD दाखल करण्यात आली आहे. तर तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज्ञा या फूरसुंगी येथील कॅनॉलला रात्री पाणी भरण्यास गेल्या होत्या. यावेळी पाणी भरत असताना पाय घसरून पडल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानंतर रात्री अग्निशमन दलाकडून शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. या दरम्यान आज सकाळी फूरसुंगी गावाच्या कडेला कॅनॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

घटनास्थळी तात्काळ हडपसर पोलीस व अग्निशमन दलाने घेतली. मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर काही वेळातच महिलेचाही मृतदेह आढळला. त्यानंतर जवानांनी तोही मृतदेह बाहेर काढला, असे सांगण्यात आले आहे. त्यावेळी तो आज्ञा यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान अद्याप त्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.