Pune : गृह मंत्र्यांच्या पत्राने गहिवरले ‘कोरोना’ शहीद पोलीसाचे कुटुंबिय (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावत असताना पोलीस पतीचे निधन झालेले. पण पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पाठविलेले पत्र स्वत: पोलीस आयुक्त घेऊन आले. आपल्या पतीच्या कार्याप्रति पोलीस दलाने व्यक्त केलेलेल्या कृतज्ञतेमुळे शहीद पोलीसाचे कुटुंबिय गहिवरले.

 

सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये राहणारे दिलीप लोंढे हे फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. या कुटुंबियांचे दु:ख हलके करण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहिले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वत: त्यांच्या निवासस्थानी जाऊन हे पत्र दिलीप लोंढे यांच्या पत्नी उषा आणि केतन यांना सुपूर्द केले. यामुळे उषा लोंढे गहिवरून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, पोलीस दलाने दाखविलेल्या संवेदनेने जगण्याचे बळ मिळाले आहे. गृह मंत्री आणि पोलीस आयुक्तांनी कुटुंब प्रमुखाने आमची काळजी घेतली आहे.

पोलीस दलातील सेवेसाठी आपल्याला मिळालेले शासकीय निवासस्थान सेवा कायम असेपर्यंत आपल्याकडेच राहिल, असे आश्वासन गृह मंत्र्यांनी या पत्रामध्ये दिले आहे. संपूर्ण पोलीस दल तुमच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला. या वेळी प्रदीप देशमुख, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विष्णु ताम्हाणे , विनोद पवार उपस्थित होते.