पुणे : खून झालेल्या व्यक्तीची फेसबुकमुळे पटली ओळख; दोन आरोपी गजाआड

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

एक महिन्यांपूर्वी खून झालेल्या व्यक्तीची फेसबुकमुळे ओळख पटवून त्याच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात खडकी पोलिसांना यश आले आहे. एक महिन्यांपूर्वी होळकर ब्रीजजवळ एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी फेसबूकवर टाकलेल्या फोटोमुळे मयत तरुणाची ओळख पटली तसेच त्याच्या मारेकऱ्यांचा देखील शोध लागला.

ओंकार सुभाष जाधव (वय -२० रा. रावेत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, बिलाल मौला आतार (वय -२० रा. निगडी) याला सोलापूर येथून तर इम्तियाज मुस्तक शेख (रा. निगडी) याला निगडी येथून अटक करण्यात आली.
[amazon_link asins=’B00J79KNPM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fd22b063-8053-11e8-92c2-e72ed3894fbd’]

ओंकार जाधव याचा खून करुन त्याच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड काम होते. पोलिसांनी फेसबूकवर पोस्ट टाकून मृत व्यक्तीची माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच मृत व्यक्तीचे पोस्टर तयार करुन ते परिसरात लावण्यात आले. पोस्टर पाहून एका महिलेने मयत व्यक्ती ही देहूरोड येथील असण्याची शक्यता वर्तवली. महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलीस देहूरोड येथे गेले असता मयत व्यक्ती हा ओंकार जाधव असल्याची माहिती मिळाली. तसेच तो २९ मे पासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याच्या नातेवाईकांनी ओंकार बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु मृत व्यक्तीचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी ओंकार जाधव याचे फेसबुक तपासले. तपासा दरम्याने ओंकारने शेवटचा टाकलेला फोटो आणि फोटोतील कपडे तसेच मृत व्यक्तीच्या अंगावीर कपड्यांवरुन मृत व्यक्ती ओंकार जाधव असल्याची खात्री झाली.
[amazon_link asins=’B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’08d82066-8054-11e8-b085-8db2ab303789′]

मृत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, खडकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश महाडीक यांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. महाडीक यांनी बिलाल मौला याला सोलापूर आणि इम्तियाज शेख याला निगडीमधून ताब्यात घेतले. त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी तीघांनी दारु पिऊन बुधवार पेठेत जाण्याचा बेत आखला होता. ओंकारला दारु जास्त झाली असताना देखील त्याने रिक्षा चालवणार असल्याचे सांगितले. आरोपींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे चिडलेल्या इम्तियाजने ओंकारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. खून करुन मृतदेह पुलाजवळील एका पाईपमध्ये टाकून दिला. तसेच ओंकारची ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहराही विद्रुप केल्याची कबूली आरोपींनी दिली.

ही कारवाई परिमंडळ -४ चे पोलीस उप आयुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपसी पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश महाडीक, पोलीस कर्मचारी सुरेश गेंगजे, प्रदीप गाडे, बाबा शिर्के, तुषार शिंदे, किरण घुटे, गणेश लोखंडे, हमेंत माने, लक्ष्मण बांगर, रणधीर माने यांच्या पथकाने केली.
जाहिरात