Pune : मालुसरे कुटुंबीयांनी वैद्यकीय उपचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला पिटाळून लावले

पुणे : प्रतिनिधी –  कोरोना महामारीने मागिल वर्षभरापासून थैमान घातले आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, बाहेरून घरात आल्यानंतर आंघोळ करणे, कामाशिवाय घराबाहेर पडायचे नाही, असे वारंवार समाजातील प्रत्येकाला सांगत होता. स्वतःही सर्व नियमांचा बांधिल होतो. मात्र, नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा समाजसेवक संकटाला घाबरून घरात कसा बसणार नाही. मजूर आणि कामगारवर्गाला अन्नधान्याच्या कीटबरोबर, औषधोपचार आणि बेड, ऑक्सिजन बेड, रेमडिसिव्हर इंजेक्शनरूपी मदत देण्यासाठी सतत धडपड होती. त्यामुळे नागरिकांचा संपर्क आला आणि त्यातूनच कोरोनाने गाठले. मात्र, वैद्यकीय इलाज, डॉक्टरांचे पाठबळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनातून सहिसलामत बाहेर पडलो. आजाराला घाबरण्याऐवजी वेळीच उपचार करून घेतले, तर तो बरा होऊ शकतो, असे स्पष्ट मत महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष आणि शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी व्यक्त केले.

मालुसरे म्हणाले की, समाजकार्यात वाहून घेऊन कोरोना काळात मागिल वर्षभरापासून नागरिकांना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकून काम सुरू ठेवले. वैद्यकीय तज्ज्ञांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला. तरीसुद्धा एक दिवस अंगामध्ये ताप आणि कणकण जाणवू लागली. त्यामुळे कोरोनाची तपासणी केली तर त्यामध्ये पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला आणि पायाखालची वाळूच सरकली. त्यानंतर पत्नी, मुलगा, मुलगी यांचीही तपासणी करून घेतली, तर तेही पॉझिटिव्ह आले. आजार झाला म्हणून रडत बसायचे नाही, तर त्यावर उपचार करणे हाच एकमेव पर्याय आहे. डॉ. औसफ शेख यांच्या म्हणण्यानुसार औषधोपचार सुरू केले. आम्हाला सर्वांना वेगवेगळे सिंथम होते. मला ताप, अंगदुखी आणि कप होता. पत्नीचे अंगदुखी, ताप, मुलगा आणि मुलीला ताप आणि डोके दुखत होते. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे त्रास होत होता. त्यामुळे प्रत्येकाला चिंता वाटू लागली होती. मात्र, आम्ही धीराने सामोरे जात कोरोनावर मात करू शकलो, असे मालुसरे कुटुंबीयांनी सांगितले.

मालुसरे कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार घरामध्ये क्वारंटाइन करून घेतले. ताप, अंगदुखी पहिल्या तीन दिवस त्रास झाला, त्यानंतर कप पडू लागला. उपचार सुरू असताना सातव्या दिवशी आम्ही सर्वजण ठणठणीत बरे झाले. तरीसुद्धा घरामध्येच 15 दिवस घरामध्ये क्वारंटाइन थांबलो. डॉ. शेख यांचा रास्ता पेठे येथे क्लीनिक आहे. तेथे जाऊन आम्ही औषधे घेत असताना इतरही रुग्ण त्यांच्याकडे येत होते. कोरोनामुक्त झालेले रुग्णही तेथे आल्यानंतर चांगला अनुभव सांगत होते, त्यामुळे आम्हाला चांगली उर्जा मिळाली आणि कोरोनातून लवकर बरे झालो. कोरोना महामारीमुळे नागरिक घाबरले आहेत. मात्र, आम्ही वेळेत उपचार घेऊन कोरोनाला पळवून लावू शकतो, एवढी सकारात्मकता मनाशी बाळगली होती. त्यामुळे कोरोनाला घाबरण्याऐवजी वेळेत उपचार आणि एकमेकांना आधार ही काळाची गरज आहे. आतापर्यंत अनेक आजार आले आणि गेले आहेत. माणसं मात्र जागेवर आहेत. त्यामुळे एकमेकाला भीती दाखवण्यापेक्षा आधार द्या, तीच मंडळी तुमच्या कामाला येतील, हे सांगण्यास बाळासाहेब विसरले नाहीत. समाजसेवा हाच माझा केंद्रबिंदू असून, जगण्याची जिद्द, मनामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा, कोणतही संकट आले तर त्या संकटावर पाय ठेवून पुढे जाण्याची धडपड अंगी असल्यामुळेच मालुसरे कुटुंबीयांनी घरामध्ये थांबूनच कोरोनासारख्या आजारावर मात केली. सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असताना प्रत्‍येक जण भयभीत आहे. मात्र, सकारात्मक विचार शक्‍तीच्‍या जोरावर अशक्‍य गोष्टदेखील शक्‍य करता येऊ शकते, हे मालुसरे यांनी घरामध्ये थांबून उपचारातून बरे होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.