Pune : येत्या 3-4 दिवसांत बेड्सची संख्या 8 हजार 300 पर्यंत वाढविणार ! बेड्सची उपलब्धता, लसीकरणाला गती आणि कोरोना नियमांची अंमलबजावणी या त्रिसुत्रीवर मनपा प्रशासनाचं लक्ष – आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरात सध्या ६५०० कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरातील ऑक्सीजन व आयसीयू बेडस्ची संख्या सातत्याने वाढविण्यात येत असून आजमितीला ७ हजार ५०० बेडस् उपलब्ध आहेत. मात्र, व्हेंटीलेटरची सुविधा असलेला एकही बेड शिल्लक नाही, ही वस्तुस्थिती आहे. येत्या काही दिवसांत आणखी ५० व्हेंटीलेटर बेडस्सह बेडसची संख्या ८ हजार ३०० पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती उपस्थित होते. आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, की १३ फेब्रुवारीपासून शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. १३ फेब्रुवारीला शहरात १ हजार २५० अ‍ॅक्टीव्ह रुग्ण होते. परंतू कालपर्यंत ही संख्या ४६ हजारांपर्यंत पोहोचली आहे. शहरात दररोज २० हजारांहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात येत असून यातून २६ ते २७ टक्के नवीन रुग्ण आढळून येत आहेत. ४६ हजारांपैकी ३९ हजार रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर ६ हजार ५०० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी ४ हजार रुग्ण ऑक्सीजन वर असून ५५० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. सध्या व्हेंटीलेटर शिल्लक नसले तरी दररोज ५ ते १० याप्रमाणे येत्या आठवड्याभरात ५० व्हेंटीलेटर बेडस् वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मागील वर्षी ७ हजार २०० बेडस् महापालिकेच्या ताब्यात होते. सध्या ७ हजार ४०० बेडस् महापालिकेच्या ताब्यात आले आहेत. हे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रुग्णालयांमध्ये पुण्याबाहेरीलही रुग्ण उपचार घेत आहेत. येत्या काही दिवसांत बेडस्ची संख्या ८ हजार ३०० पर्यंत वाढविण्याचे नियोजन केले आहे. बिबवेवाडी येथील ई.एस.आय.चे १३० बेडस् रुग्णालय स्टाफसह ताब्यात घेण्यात येत आहे.येथे ऑक्सीजनचे ७० व एचडीओचे २० बेडस व रुग्णालयाचा सर्व स्टाफही मिळणार आहे. लष्कराच्या एआयसीपी रुग्णालयातील २० व्हेंटीलेटर व २० एचडीओ बेडस् येत्या आठवड्याभरात उपलब्ध होणार आहेत. सध्या शहरात ४०० ऑक्सीजन बेडस् शिल्लक आहेत. रुग्णांना बेड कमी पडू देणार नाही.

१०० कर्मचारी असलेल्या उद्योग व व्यावसायीक आस्थापनांमध्ये जाउन लसीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात काही उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद झाला आहे. अशा औद्योगीक आस्थापनांनी महापालिकेकडे नोंदणी केल्यास त्या ठिकाणी जावून कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात येईल. यासाठी १५ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेला आतापर्यंत ५ लाख ९७ कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत ५ लाख ८ हजार डोसेस देण्यात आले आहेत. रुग्णालयांकडे ४५ हजार तर महापालिकेकडे २५ हजार डोसेस शिल्लक आहेत. दररोज १२५ केंद्रांवर २० ते २२ हजार जणांना डोस देण्यात येत आहेत. मागील महिन्याभरात तब्बल ५ लाख लोकांचे लसीकरण केले आहे. ही गती कायम ठेवण्यासाठी केंद्र शासनाकडे लशींची मागणी करण्यात आली आहे. लसीकरण वेगाने करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे, असे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

महापालिकेची त्रिसुत्री

रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, लसीकरण वाढविणे आणि कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणे या त्रिसुत्रीवर महापालिकेचे काम सुरू आहे. कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ६० पथके तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्‍या ३ लाख २२ हजार लोकांवर कारवाई करून १५ कोटी ७७ लाख रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. १५ हजार हॉटेल्स, मॉल्सवरही कारवाई करून ३० लाख रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

रेमडिसीवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णालय व मेडीकल्समध्ये गर्दी होत आहे. शहरात या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपाट होत आहे, याकडे आयुक्त विक्रम कुमार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, शहरात रेमडिसीवीरच्या उपलब्धतेसाठी एफडीएच्या अधिकार्‍यांसोबत सातत्याने समन्वय राखण्यात येत आहे. आज शहरात दोन हजार इंजेक्शन उपलब्ध झाली असून उद्या दोन हजार इंजेक्शन उपलब्ध होतील.

महापालिकेची कोव्हिड हेल्पलाईनचे संचलन करण्यासाठी खाजगी संस्था नेमली आहे. हेल्पलाईन क्रमांकावर दररोज ५०० ते ६०० कॉल्स येत आहेत. यासाठी येथील संपर्क क्रमांक ५ वरून १५ पर्यंत वाढविण्यात आले आहेत. तसेच मनुष्यबळही वाढविण्यात आले आहे. मोठ्या सोसायट्यांच्या मागणीवरून तेथे जाउन लसीकरण करण्यासंदर्भात अद्याप राज्य शासनाकडून आदेश आलेले नाहीत, असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.