Pune : ऑक्सीजन बेड्सची संख्या वाढतेय पण अडचण आहे ती ‘ऑक्सीजन’ची; मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने तूर्तास बेडस् तयार होउनही…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच बेडस्ची कमतरता जाणवू लागल्याने विविध ठिकाणी ऑक्सीजन बेडस् निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ऑक्सीजनचाच पुरवठा कमी होत असताना त्याचे डिस्ट्रीब्युशन करण्याचेही आव्हान प्रशासनासमोर उभे राहीले आहे.

शहरात सुमारे ५५ हजार कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आहेत. यापैकी साडेपाच हजार रुग्ण ऑक्सीजनवर असून बाराशेहून अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महापालिका देखिल खाजगी, महापालिका आणि शासकिय रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडस् वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासोबतच विविध राजकिय पक्ष आणि स्वंयसेवी संस्था देखिल ऑक्सीजनची सुविधा असलेले क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यासाठी पुढे आल्या आहेत. परंतू यानंतरही होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या पॉझीटीव्ह रुग्णांची ऑक्सीजनची पातळी कमी झाल्यानंतर नातेवाईकांकडून ऑक्सीजन बेडस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच घरच्या घरी ऑक्सीजनचे युनिट मिळविण्यासाठीची मागणी वाढू लागली आहे.

कोरोनाच्या या विदारक परिस्थितीमध्ये मात्र ऑक्सीजनचा तुटवडा भासू लागल्याने स्वत: जिल्हाधिकारी ऑक्सीजन पुरवठ्यावर लक्ष ठेउन आहेत. यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनीही ऑक्सीजन पुरवठ्यातील समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र टीम्स तैनात केल्या आहेत. पुण्यात सर्वाधीक रुग्ण महापालिकेच्यावतीने चालविण्यात येणार्‍या शिवाजीनगर येथील सीओईपी रुग्णालय, नायडू रुग्णालय, बाणेर कोव्हिड हॉस्पीटल आणि दळवी हॉस्पीटलमध्ये आहेत. सीओईपीमध्ये दररोज १६ टन ऑक्सीजनची गरज असून उर्वरीत सर्व रुग्णालयांची गरज मिळुन ४५ टन आहे. यासोबतच शहरातील खाजगी रुग्णालये आणि कोव्हिड सेंटरसाठीही मोठ्याप्रमाणावर ऑक्सीजनची गरज आहे.

जिल्ह्यात ३८० टन ऑक्सीजन निर्मितीची क्षमता असलेल्या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या चाकण परिसरात आहे. तर संपुर्ण जिल्ह्याची फक्त कोरोनासाठी ३०० टनांची डिमांड आहे. याठिकाणाहून हा ऑक्सीजन पुरवठा होत असून विदर्भ आणि मराठ्यावाड्यातील काही शहरांमध्ये येथूनच ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनचा टँकर अर्धा एक तास उशिरा आला तरी मोठ्या रुग्णालयांमध्ये विशेषत: जंबो रुग्णालयामध्ये रुग्णांऐवजी डॉक्टर्स आणि अधिकार्‍यांनाच धाप लागत आहे. याठिकाणी ६५० रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.

यासोबतच महापालिकेने बिबवेवाडी येथील केंद्र सरकारचे ई.एस.आय. रुग्णालय ताब्यात घेतले आहेत. याठिकाणी ९० बेडस् ऑक्सीजनचे आहेत. तसेच गणेश कला क्रिडा मंच येथेही १०० बेडस्चे ऑक्सीजन बेडस्युक्त कोव्हिड सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, सध्यस्थितीत ऑक्सीजनचाच पुरवठा होत नसल्याने या दोन्ही ठिकाणी उपचार सुरू करणे अवघड होउन बसले आहे. दुसरीकडे अनेक मान्यवर आणि सामाजिक संस्था त्यांच्या भागामध्ये २० ते ५० बेडस्चे ऑक्सीजन बेडस् युक्त क्वारंटाईन सेंटर सुरू करत आहेत. मात्र, ऑक्सीजन पुरवठ्याची शाश्‍वती होत नाही तोपर्यंत ही सेंटर्सही सुरू करण्यात अडचण येत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.