Pune : हडपसरमधील पावसाळापूर्व कामाला आज मिळाला मुहूर्त

पुणे : हडपसरमधील (प्रभाग क्र.23) पावसाळापूर्व कामे दोन दिवसांत केली नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांनी दिल्याचे वृत्त पोलीसनामामध्ये बुधवारी (दि. 19 मे) प्रसिद्ध होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. पालिकेचे कनिष्ठ अभियंता रावसाहेब खंडागळे यांनी आज गुरुवारी (दि. 20 मे) घटनास्थळाची पाहणी केली. पाहणीदरम्यान एक तासाच्या आत मंत्री मार्केट येथील नाल्याच्या साफसफाईचे काम सुरू केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, उपशहरप्रमुख समीर तुपे, जान महमद, नितीन गावडे, प्रशांत पोमन, संतोष होडे उपस्थित होते.

खंडागळे यांनी ठेकेदाराला घटनास्थळी बोलावून कामातील त्रुटी दाखविल्या. तसेच ओढ्या-नाल्याची वरच्यावर कामे करून चालणार नाही. ज्या ठिकाणी ओढ्या-नाल्याची रुंदी आणि खोली वाढविण्याची गरज आहे, तेथे ती कामे करून घ्या, ओढ्या-नाल्याच्या बाजूला वर राडारोडा पडला आहे, तो स्वच्छ करा. ही कामे तुमच्या पद्धतीने नाही, तर आम्हाला हवी त्या पद्धतीने झाली पाहिजेत. अन्यथा पुन्हा ती कामे करावी लागतील, असा सज्जड दम त्यांनी ठेकेदाराला दिला. टप्प्याटप्प्याने कामे करणे योग्य नाही, तुम्ही फक्त चेंबर स्वच्छ करता, मात्र पाईपमधील गाळ का काढला नाही, त्यामुळे पाईपसुद्धा स्वच्छ करा, पावसाचे पाणी कुठे साचणार नाही, याची दक्षता घ्या. हडपसर परिसरामध्ये ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते, त्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सूचना केल्या.

यावेळी महेंद्र बनकर यांनी अधिकारी खंडागळे यांना मंत्री मार्केट ते काळे-बोराटेनगरपर्यंत ओढ्याची परिस्थिती दाखविली. तसेच, काळेपडळ, ससानेनगर, हडपसरगाव, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी परिसरात ज्या ठिकाणी पाणी साचते ती ठिकाणे दाखविली. पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, अशा पद्धतीने काम करण्यासाठी त्यांनी सूचविले. दरम्यान, पावसाळी व सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता केली नाही, काही ठिकाणी केली तेथेच चेंबरमधील कचरा टाकल्याचे दाखवून दिले. काळेबोराटेनगर, ससाणेनगर, हडपसरगाव, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर परिसरामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पावसाचे पाणी साचणार नाही, अशा पद्धतीने पावसाळापूर्व कामे झाली पाहिजेत. प्रभाग क्र.22मधील पावसाळापूर्व कामे झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी खंडागळे यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व ठिकाणची पावसाळापूर्व कामे केली जातील, असे आश्वासन दिल्याचे बनकर यांनी सांगितले.

दरम्यान, ज्युनिअर इंजिनिअर खंडागळे यांनी सांगितले की, हडपसर येथील नालेसफाईच्या कामाचे 32 लाख रुपये किमतीचे टेंडर मंजूर झाले आहे. त्यातून हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नालेसफाई व पावसाळा गटारे साफसफाई केली जाणार आहेत. ही कामे १ जूनपर्यंत पूर्ण करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. पाहणी झाल्यानंतर तातडीने हडपसरमधील मंत्री मार्केट येथील नाल्याची स्वच्छ्ता व साफसफाई चे काम सुरू झालेले पहावयास मिळाले, असे बनकर यांनी सांगितले.