Pune : कोरेगाव पार्क येथील साधु वासवानी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव पार्क येथील साधु वासवानी रेल्वे उड्डाणपुलाचे नव्याने बांधकाम करण्याची चाचपणी करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. सल्लागार नियुक्तीसाठी महापालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ४० वर्षांपुर्वी कोरेगाव पार्क येथील साधु वासवानी रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम केले आहे.

दरम्यान २०१८ मध्ये महापालिकेने सर्व उड्डाणपुलांचे थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडीट केले आहे. त्यामध्ये या पुलावरून जड वाहतुकीस बंदी घालण्याबाबत सुचविण्यात आल्यानंतर या पुलावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पुलाच्या दुरूस्तीही कामे सुचविण्यात आली होती. सध्या या मार्गावरून दुचाकी आणि हलक्या मोटारीच जातात. रेल्वेनेही त्यांच्या जागेत असलेल्या उड्डाणपुलाचा भाग हा सुस्थितीत असल्याचा मोघम अहवाल दिला आहे.

या उड्डाणपुलाला पर्याय म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूस नवीन मार्गीका उभाराव्यात असेही अहवालामध्ये सुचविण्यात आले आहे. जुन्या राज्य मार्गावर असलेला हा रेल्वे उड्डाणपुल महापालिका, पुणे कॅन्टोंन्मेंट आणि रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येतो. तसेच स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालामध्ये फारशी स्पष्टता नाही. या परिसरात मेट्रो मार्ग, रेल्वे तसेच रस्त्यांचे जाळे असल्याने भविष्यात जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही निर्माण करावे लागणार आहेत. याचा विचार करून महापालिकेने नवीन विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणासह उड्डाणपुलाच्या कामाचे नियोजन करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर यांनी दिली.