Pune : गोसावीवस्तीतील गोसावी शाळेमागील झोपडपट्टी भोगतेय नरकयातना

पुणे : चारही बाजूने कचरा, डुकरांचा वावर, स्वच्छतागृह नाही त्यामुळे महिलांची प्रचंड कुचंबना होत आहे. अशा ठिकाणी चारही बाजूने पत्रा, डोक्यावर पत्र्याचेच शेड अशा भयानक वस्तीमध्ये राहणाऱ्या परिस्थितीने गांजलेल्या आणि असह्य नागरिकांच्या समस्यांना पारावरच उरला नाही. ही परिस्थिती पुणे महानगरपालिकेच्या कै. नर्मदाबाई किसन कांबळे शाळेच्या पाठीमागील बाजूस वसलेल्या वैदूवाडीतील गौंडवस्तीमधील नागरिकांची. रामटेकडी-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणीही दखल घेतील नाही, असे येथील नागरिकांनी सांगितले.

आधार फाऊंडेशनच्या अध्यक्षा मयुरी बामणे म्हणाल्या की, रस्ता आणि मलवाहिनीचे काम सुरू केले होते. मात्र, ठेकेदार आणि काही नागरिकांचा वाद झाल्याने अर्धवट काम सोडून ठेकेदार निघून गेला. त्यानंतर अद्यापपर्यंत येथील काम करण्यासाठी पालिका प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिक आज नरकयातना भोगत असल्याचे त्यांनी सांगितले.

बामणे म्हणाल्या की, पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टीमधील नागरिकांना स्वच्छतागृह देण्याची संकल्पना राबविली आहे. मात्र, अद्यापपर्यंत वैदूवाडीतील गोसावीवस्ती झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांपर्यंत महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह पोहोचले नाही. महापालिका ते वैदूवाडी-गोसावीवस्ती हा प्रवास कदाचित प्रचंड दूरचा असेल, त्यामुळेच पालिकेच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत की, काय असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. गोसावीमस्तीमध्ये चेंबर तुंबले, मलवाहिनी तुंबली की, तातडीने तेथे जाऊन स्वच्छता करायची आणि नागरिकांची अडचण दूर करायची त्यांची वस्ती आहे. त्यांच्याच वस्तीमधील मलवाहिनी तुंबली असून, दुर्गंधीयुक्त पाणी दारासमोर रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वैदूवाडीमधील गोसावीवस्ती, पारधी गल्ली, कालीमाता मंदिराशेजारी, अंबिका तरुण मित्रमंडळ चौक, नागरी वस्तीमध्ये मलवाहिनी नाही, रस्ता नाही, तर गौंडवस्तीमध्ये सार्वजनिक वा वैयक्तिक स्वच्छतागृह नाही, त्यामुळे येथील महिलांची कुचंबना होत आहे. सुमारे 50-60 झोपडपट्टीधारकांसाठी पिण्याच्या पाण्याचा एक सार्वजनिक नळ दिला आहे. मागिल 30 वर्षांपासून येथे नागरीवस्ती आहे. कचरा स्वच्छ केला जात नाही. सांडपाणी उघड्यावर साचत असल्याने डास-मच्छरांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असतो, त्यामुळे येथील नागरिकांना वारंवार साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. या वस्तीमध्ये डुकरांचा वावर वाढला असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना चावा घेतल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. याबाबत रामटेकडी-वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून काम करण्याचे आश्वासन मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात काम केले जात नसल्याने येथील नागरिक त्रासले आहेत.