Pune : हडपसर गांधी चौकातील मजुरांवर आली उपासमारीची वेळ

पुणे : कोरोना महामारीच्या मगरमिटीतून सावरत असताना दुसऱ्या लाटेने खिंडीत गाठले. राज्यात कडक निर्बंध लागू केले असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे हॉटेल आणि बांधकामासह इतर क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची उपासमार होऊ लागली आहे. मागिल अनेक वर्षांपासून राज्य-परराज्यातून आलेला मजूरवर्ग दररोज सकाळी भाकरतुकडा घेऊन हडपसर गांधी चौकात रोजगारासाठी थांबत आहे. त्याशिवाय काही मंडळींचा उड्डाण पुलाखालीच मुक्काम आहे. मागिल दोन महिन्यांपासून हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू आहे, तर बांधकाम क्षेत्र पूर्णपणे ठप्प असल्याने कुशल आणि अकुशल कामगार सैरभैर झाला आहे. महिन्याभरापासून सकाळी शिवभोजन मिळते, त्यावर गुजरान करीत असल्याचे येथील बिगारी काम करणाऱ्यांनी सांगितले. कोरोनाचे संकट लवकर दूर होवो आणि आम्हाला रोजगार मिळो, एवढीच ईश्वराला या मंडळींनी भावनिक साद घातली.

हडपसर परिसरामध्ये उमेश पवार (बुलडाणा), पंकज लिंगरे (लातूर), अक्षय सोनकांबळे (लातूर), प्रेम थापा (हिमाचल प्रदेश) यांच्यासह शेकडो लोक रोजगारासाठी आले आहेत. उड्डाण पुलाखाली ठेकेदार येईल आणि रोजगार मिळेल या आशेने ही मंडळी येतात. मात्र, कोरोनामुळे रोजगार नाही, हाताला काम नाही, पैसा नाही, त्यामुळे एकवेळ शिवभोजनाच्या माध्मयातून दोन चपात्या, वरण, भात, भाजी मिळते, त्यावर त्यावर गुजरान करीत असल्याचे केविलवाण्या सुरात या मंडळींनी सांगितले.

अहो, साहेब… मागिल दोन महिन्यांपासून रोजगार नाही, त्यामुळे शंभर रुपयाची नोट पाहिली नाही. हाता काम नाही, त्यामुळे उपासमार होत आहे. आमचा आवाज सरकारपर्यंत जात नाही. कामधंदे बंद आहेत, त्यामुळे ठेकेदारही फिरकत नाही. एखादा ठेकेदार आला तर एका कामासाठी आम्ही शंभर-दीडशे लोक त्याच्या मागे लागतो. त्यामुळे ठेकेदारही चक्रावून जात आहे.

पुलाखालीच झोपतो, कालव्यात आंघोळ करतो आणि पुन्हा सकाळी रोजगार मिळेल या आशेने थांबतो. रोजगार मिळाला नाही, तर कोणीतरी दोन घास पोटासाठी देईल, या आशेने वाट पाहतो. मागिल वर्षी जेवण मिळत होते, यावर्षी कोणी जेवण देण्यासाठी येत नाही. सर्वांचीच परिस्थिती वाईट झाली आहे, त्यामुळे कोणाला दोष द्यायचा, आमचं नशिबचं फुटकं असे म्हणून त्यांच्या डोळ्यातून गंगा-यमुना वाहू लागल्या. आम्हाला गावाकडे जाण्यासाठीसुद्धा पैसे नाहीत. गावाकडे जाऊन तरी काय करायचे, शेतीभाती नाही, घरदार नाही, रोजगार नाही, शिक्षण नाही म्हणून तर शहराकडे आलो. हाताला काही तरी काम मिळेल, त्यातून पोट भरू असे वाटले होते. त्याप्रमाणे आम्हाला रोजगारही मिळू लागला होता. मात्र, कोरोनाचे संकट आले आणि सारे काही संपले असे वाटू लागले आहे, असे बोल रडवेल्या सुरात ही मंडळी ऐकवत होती.

हडपसर-गांधी चौक हा मजुरांना थांबण्यासाठी हक्काचे ठिकाण आहे. भल्या सकाळी येथे हजार-दीड हजार कामगार थांबतात. मात्र, कोरोना महामारीच्या भीतीने अनेकांनी गाव गाठले आहे. ज्यांना गावाकडेही काही नाही आणि इथेही काही नाही, अशा मंडळींनी पुलाखालीच मुक्काम ठोकला आहे. कोणी घासभर देईल, त्यावर दिवस काढायचे, नाही मिळाले तर उपाशी झोपायचे. शिवभोजन थाळी पोटाला आधार ठरत आहे. त्यामुळे पोटात दोन घास जातात, अर्धपोटी झोप येत नाही म्हणून एकमेकांना आधार देत बोलत बसतो. पोलीस म्हणतात, जा की घरी. त्यांना कसे सांगायचे इथे रोजगार नाही, पोटाला पोटभर अन्न नाही, तर घरदार कसे असेल. वाईट दिवस आले आहेत, दादा…. आमचे दुःख कोणी जाणत नाही. ठेकेदार कामाला नेतो, अर्धा पगार देतो, एवढेच का विचारले, तर शिव्या घालतो आणि म्हणतो उद्यापासून तू माझ्याकडे येऊ नको, मला तुझी गरज नाही. त्यामुळे नाईलाजाने गुमान मिळेल, ते घेतो आणि गप्प बसतो. हाताला कामच नाही, त्यामुळे दररोज पोट कसे भरायचे, बाकी गोष्टींचा विचारच आम्ही करत नाही. दाढी, केस कापणे, आंघोळीसाठी साबण, कपडे बदलण्यासाठी नाहीतच तर बदलणार तरी कशी अशा एक ना अनेक व्यथा या मजुरांनी मांडल्या. हडपसर नगरीमध्ये दानशूरांची कमी नाही, त्यांनी मजूर अड्ड्यावरील मजुरांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असा सूर अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.