चतुश्रृंगी, येरवड्यात लुटमारीचे सत्र सुरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाषाण-बाणेर रस्त्यावरील टेकडीवर मैत्रिणीबरोबर फिरायला गेलेल्या महिलेला धमकावून तिच्याकडील 2 लाख 20 हजारांचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. चतुश्रृंगी परिसरात सुरू झालेले लुटमारीचे सत्र कायम आहे. बाणेर परिसरातील महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि तिची मैत्रिण सोमवारी सकाळी पाषाण-बाणेर परिसरातील टेकडीवर फिरायला गेल्या होत्या. त्यांच्या मागावर चोरटा होता. चोरट्याने त्यांना वाटेत गाठले. त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. धक्काबुक्की करुन चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 2 लाख 20 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. तोपर्यंत चोरटा टेकडी उतरुन पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करत आहेत.

तसेच, येरवडा भागातही एका बाहेरून आलेल्यास दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. गुंजन चित्रपटगृहाजवळ सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. अफसर शेख (वय 36,रा. देवळे, औरंगाबाद) यांनी यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेख सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास गुंजन चित्रपटगृहाजवळ चहा विक्रीच्या दुकानाजवळ थांबले होते. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी शेख यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी विरोध केल्यानंतर धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्याकडील आठ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून चोरट्यांनी दुचाकीवरुन पोबारा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक करपे तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –