शिवनेरी बसमधून पुन्हा ऐवज चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट बस स्थानकात चोरटे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत असून, शुक्रवारी पुन्हा एकदा शिवनेरी बसमधून किंमती ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात चोरटे चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी विनय हेडा (वय 33,रा. हडपसर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेडा हे हडपसर परिसरात राहण्यास असून, दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी निघाले होते. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात थांबलेल्या शिवनेरी बसमध्ये त्यांनी प्रवेश केला. हेडा यांच्याकडे लॅपटॉप, तीन हजारांची रोकड, पेनड्राइव्ह तसेच कागदपत्रे असलेली पिशवी होती. ती त्यांनी बसमधील लोखंडी जाळीत (रॅक) ठेवली. बस निघण्यास वेळ होता. त्यामुळे हेडा हे बसमध्येच थांबले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी हेडा यांचे लक्ष नसल्याची संधी साधून 26 हजार रुपयांचा ऐवज असणारी पिशवी चोरून नेली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीसांकडे तक्रार दिली आहे. पोलीस नाईक व्ही. एम. कुंभार तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानक परिसरात बाहेर गावी निघालेल्या प्रवाशांना लक्ष केले जातात. बसमध्ये गेल्यानंतर त्यांचा ऐवज चोरला जात आहे, तर काही वेळा गुंगीचे औषध देऊन लुटले जात आहे. तर, स्थानकाच्या बाहेरील परिसरात पुण्यात आलेल्या प्रवाशांना लक्ष केले जात आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.