पुणे : शिवाजीनगर पोलिस लाईनसमोरच सराफास लुटलं, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर भागातील पोलीस वसाहतीसमोरच दुचाकीस्वार सराफ व्यावसायिकाला लुटल्याची घटना घडली आहे. धमकावून सोन्याचे दागिने व रोकड असा 1 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. चोरटे सराफाकडील दुचाकीही घेऊन पसार झाले आहेत.

मिठूसिंह राजपुरोहित (वय ४६,रा. कसबा पेठ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजपुरोहित यांचे वडारवाडी भागात सराफी दुकान आहे. राजपुरोहित दागिने गहाण ठेवून व्याजाने पैसे देतात. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ते संत ज्ञानेश्वर महाराज चौकातून शिवाजीनगर पोलीस वसाहतीकडे जात होते. त्यावेळी राजपुरोहित यांच्या मागावर असलेल्या दुचाकीस्वार चोरटा आणि साथीदाराने राजपुरोहित यांच्या दुचाकीला मागून लाथ मारली. त्यामुळे राजपुरोहित यांचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यात पडले. चोरट्याने राजपुरोहित यांना धमकावले. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच रोकड असा १ लाख रुपयांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर चोरट्याचा साथीदार राजपुरोहित यांची दुचाकी घेऊन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून राजपुरोहित यांना लुटणारे चोरटे माहितगार असल्याचा संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड तपास करत आहेत.

नर्हेत दुचाकी चालकाला लुटले
शिवाजीनगरला धमकावून लुटल्याची घटना ताजी असताना नर्हेत दुचाकी चालकाला लुटले आहे. याबाबत महादेव जाधव (वय ४०,रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जाधव मोटारीतून रात्री पावणेबाराच्या सुमारास घरी जात होते. आंबेगाव बुद्रुक भागातील एका सोसायटीजवळ त्यांच्या मोबाइलवर परिचिताने संपर्क साधल्यानंतर ते थांबले. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी जाधव यांना धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्याने जाधव यांच्या हातावर कोयत्याने वार केला. त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या, मोबाइल संच, सात हजारांची रोकड असा ४७ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक व्ही. जे. महांगडे तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like