येरवड्यात महावितरण कार्यालयात चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा भागात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालय फोडण्यात आले आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान शहरात सुरू झालेले घरफोड्याचे सत्र काही थांबत नसल्याचे दिसत आहे. याप्रकरणी नंदाराम वैरागर (वय ५३, रा. वाघोली) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदाराम येरवड्यातील प्रतिकनगर येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये सहायक अभियंता पदावर कार्यरत आहेत. दोन दिवसांपुर्वी काम संपल्यानंतर त्यांनी कार्यालयाला कुलूप लावले होते. त्यानंतर चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून ४ हजार ६०० रुपयांची रोकड आणि मोबाईल चोरुन नेला. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर नंदाराम यांना कार्यालयात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी येरवडा पोलिस तपास करीत आहेत.