पुणे : प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याचे सत्र कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात पीएमपीत होणार्‍या चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, पुन्हा पीएमपी प्रवासात ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोळ्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागत नसल्याचेही दिसत आहे. चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आपली चोख कामगिरी पार पाडत आहेत.

याप्रकरणी 71 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अरण्येश्वर भागातील रहिवासी आहेत. त्या स्वारगेट स्थानक परिसरातून अरण्येश्वरकडे जात असलेल्या बसमध्ये प्रवास करत होत्या. यावेळी बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी हाच फायदा घेऊन त्यांच्या हातातील 60 हजारांची सोन्याची बांगडी लांबविली. काही वेळाने त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस हवालदार आर. एच. गायकवाड तपास करत आहेत.

तरुणाचा मोबाईल हिसकावला..

महिलांवर लक्ष केंद्रीत करणार्‍या चोरट्यांनी एका तरुणाचा मोबाईलही प्रवासादरम्यान चोरून नेला आहे. स्वारगेट ते पद्मावती पीएमपीतून जात असताना ही घटना घडली आहे. याबाबत अथर्व शहा (वय 22,रा. पद्मावती) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याच्याकडील 20 हजारांचा मोबाइल संच चोरट्यांनी लांबविला.