पुण्यात PMPML बसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, 3 महिलांचे दागिने लंपास

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपीएल बसप्रवासात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. एकाच दिवसात शहरातील पीएमपीएल प्रवासादरम्यान महिलांचे दागिने चोरून नेल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. लष्कर, स्वारगेट आणि सिंहगड रोड परिसरात या घटना घडल्या आहेत.

वारंवार घडणार्‍या घटनांमुळे जेष्ठ महिलांसह महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

याप्रकरणी 76 वर्षीय महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास मुलीकडे जात होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. मगरपट्टा बसस्थानक ते पुलगेटदरम्यान पीएमपीएल बसप्रवास गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 75 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरुन नेली. बसस्थानकावर उतरल्यानंतर बांगडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

दुसरी घटना स्वारगेट परिसरात घडली आहे. तरूणी स्वारगेट परिसरातून विश्रांतवाडी येथे जाणार्‍या बसमध्ये प्रवास करत होती. यावेळी चोरट्यांनी तिच्या पर्समधून सोन्याचे पॅन्डेल व रोकड असा 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तसेच, तिसर्‍या घटनेत 68 वर्षीय महिलेच्या हाताली 75 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेण्यात आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला या दीराच्या घरी जाण्यासाठी धायरी ते हडपसर बसमध्ये प्रवास करत असताना घडली. हिंगणे खुर्द येथे आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.