Pune : कोथरूडमध्ये भरदिवसा सिग्नलवर थांबलेल्या तरूणीच्या कारमध्ये शस्त्रधारी तरूण घुसला, अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोथरूड सारख्या उच्चभ्रू भागात सिग्नल लागल्याने कार थांबवलेल्या महाविद्यालयीन तरुणीच्या कारमध्ये शिरत शस्त्रधारी तरुणाने लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे कोथरूड भागात परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी भुसारी कॉलनीत राहायला आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.

२७ सप्टेंबरला ती मित्रांना भेटण्यासाठी कोथरुडमधील मोरे विद्यालयाजवळ गेली होती. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ती कारने एकटीच घरी जात होती. त्यावेळी भारतीनगर परिसरात सिग्नल लागल्याने तीने कार थांबविली. त्याचवेळी मोटारीच्या डाव्या बाजूने एक तरुण गाडीत घुसला. त्याने तिला कोयत्याचा धाक दाखवून यु-टर्न घेण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत तिने यु-टर्न घेतला. हातात कोयता असलेल्या तरुणाने तिला दोनदा कोथरुडमध्ये फिरविले. तसेच कार चांदणी चौकात नेण्यास सांगितले. यानंतर तिला पैसे मागितले. तिच्याकडे रोकड नव्हती. त्यामुळे तिने एटीएममधून पैसे काढून देते असे सांगितले. त्यामुळे चांदणी चौकातील गणेश भेळ परिसरात तिने कार थांबवली. खाली उतरताच आरडा-ओरडा करत वेगाने पळ काढला. याघटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. परिसरात दहशतीचे वातावरण आहे. भर वर्दळीच्या वेळी हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.