पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेलच्या पार्किंगमधून कारची काच फोडून ऐवज लंपास

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रोड परिसरातील प्रसिद्ध ब्रह्मा हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी भरदिवसा 45 हजाराचा ऐवज चोरून नेला. दोन दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मुळच्या कोल्हापूर येथील आहेत. दोन दिवसांपुर्वी (दि. 8) कामानिमित्त त्या पुण्यात आल्या होत्या. जेवण करण्यासाठी त्या दुपारी ब्रम्हा हॉटेलमध्ये गेल्या. यावेळी त्यांनी त्यांची कार हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केली. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडून मोबाईल, दोन हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा मिळून 45 हजारांचा ऐवज चोरुन नेला. त्या जेवणकरून काही वेळाने परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. हॉटेलच्या पार्किंगमधूनच चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. अधिक तपास सहायक फौजदार कडू हे करत आहेत.