आता चोरट्यांचा वेगळाच ‘फॉर्म्युला’, पाय धरून माफी मागत जेष्ठ नागरिकाला लुबाडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील रस्त्यावरील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढच होत असून, पादचारी जेष्ठ नागरिकाला चोरट्याने धक्का दिला अन त्यानंतर पाय धरुन माफी मागण्याचा बहाणा करुन त्यांच्या खिशातील तब्बल ४५ हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन रस्त्यावरील डेकॉर शोरुमसमोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी ईश्वर अल्गुर (वय ६१, रा. बंडगार्डन ) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर काल घरातील ४५ हजारांची रोकड घेउन सोसायटीत जमा करण्यासाठी रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका चोरट्याने त्यांना लाथ मारली. त्यानंतर चोरट्याने ईश्वर यांच्या जवळ जाउन काका मला माफ करा, लाथ चूकून लागली असे म्हणत त्यांचे पाय धरले. त्यावेळी ईश्वर खाली वाकले असता, चोरट्याने त्यांच्या खिशातील ४५ हजारांची रोकड चोरुन पसार झाला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस अधिक तपास करीत आहेत.

You might also like