फरासखाना परिसरात अडीच लाखांची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फरासखाना परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी रूपाली जागडे (वय 56, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कसबा पेठेतील गावकोस मंदिराजवळ असणार्‍या कृष्णा हाईट्समध्ये पाचव्या मजल्यावर राहण्यास आहेत. दरम्यान, त्या देवीच्या यात्रेसाठी कुटूंबियासह गावी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्या गावावरून परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे धाव घेतली. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –