Pune : हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात घरफोड्या होण्याच्या घटना पुन्हा वाढल्या असून, त्या रोखण्यात यश नसल्याचे दिसत असतानाच हडपसर परिसरात बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी 12 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. आता पोलिसांनी चोरट्याचा माग सुरू केला आहे.

याप्रकरणी सुयोग बाबूलाल जाधव (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ससाणेनगर येथील प्रतिभा रेसिडेंसी याठिकाणी राहतात. त्यांचा फुलांचा व्यवसाय आहे. तर, त्यांची एकत्र कुटुंब आहे. भाऊ, आई-वडील असे राहतात. दरम्यान ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील आहेत. काही खासगी कामानिमित्त ते घराला कुलूप लावून गावी गेले होते. ते 7 एप्रिल रोजी येथून गेले होते. यादरम्यान चोरट्यानी हीच संधी साधत कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील 28 तोळे सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज असा 12 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. फिर्यादी हे 11 एप्रिल रोजी परत आले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही पडताळणी सुरू केली असून, थोडक्यात माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रत्नदीप गायकवाड हे करत आहेत.