Pune : चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून 21 लाखांचा ऐवज नेला चोरून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पेस्ट कंट्रोल केल्याने घर बंद करून बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून 21 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पुण्यातील ढोले पाटील रोड येथे ही घटना घडली आहे.

या प्रकरणी शंतनू ढोले पाटील (वय ३९) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू कुटुंबीयासह ढोले पाटील रस्त्यावरील सिंधुदत्त सोसायटीत राहायला आहे. त्यांचा संगीत साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घरात पेस्ट कंट्रोल केले होते. त्यामुळे ते घर बंद करून कुटुंबीयासह दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, डायमंड असा २१ लाख १६ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार समोर येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रूपेश चाळके यांनी दिली आहे.