Pune : चोरट्यांचा शहरात ‘उच्छाद’ सुरूच ! दत्तवाडी, कोंढवा, हडपसर, चंदननगर अन् येरवडा परिसरातील 3 फ्लॅट आणि 2 दुकाने फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गुन्हेगारांनी उच्छाद घातला असून, पुन्हा तीन फ्लॅट व दोन दुकाने फोडून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. दत्तवाडी, कोंढवा, हडपसर, चंदननगर व येरवडा परिसरात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात 60 वर्षीय लीला सावंत यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पर्वती दर्शन येथे राहण्यास आहेत. त्यांचे घरातच एक दुकान आहे. चोरट्यांनी दुकान बंद असताना ते उचकटून आत प्रवेश केला. यसेच दुकानातले 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत. तर दुसरी घटना येरवडा भागात घडली आहे. याबाबत उमेश भोजवाणी (वय 40) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. भोजवणी यांचे नगर रस्त्यावर ऐन. एम. वाईन्स शॉपी आहे. अज्ञात चोरट्यांनी शॉपी काल पहाटे फोडली. वाईन शॉपीमधून लोखंडी तिजोरी आणि 1 लाख 88 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. तसेच वडगाव शेरी भागात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर घर मालक मयूर शिंदे (वय 31) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलोसानी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पण तो अद्याप लागलेला नाही. तर चौथी घटना हडपसर येथील फुरसुंगी गावात घडली असून, बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 1 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी रवितेजा बेजवाडा (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेजवाडा हे कामानिमित्त मूळ गावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत. पाचवी घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथील कोंढवा बुद्रुक येथे राहणारे सय्यद एजाज सय्यद हरूण (वय 27) यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे. त्यांच्या येथून चोरट्यांनी दागिने व रोकड असा 18 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शहरात सुरू असणाऱ्या लूटमार आणि घरफोड्याच्या घटनांनी पुणेकर हैराण झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असले तरी ते काही हाती लागत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या घटना काही थांबत नसून, चोरटे आपले चोक कामगिरी करत आहेत.