Pune : स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या चोरट्यांनी मंचर येथील ATM मशीनच चोरून नेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत मंचर शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे एटीएम मशीनच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ॲक्सिस बँकेच्या या एटीएममध्ये 5 लाख रुपयांची रक्कम होती. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना आजूबाजूला काही नागरिक होते. मात्र, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. चोरट्यांनी एटीएम मशीन नेल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना कळवली.

या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर शहरात व्यापारी मार्केट येथे एका गाळ्यात गेल्या चार वर्षांपासून हे एटीएम सेंटर आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीत. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली. चोरटे खाली उतरल्यानंतर त्यांनी आसपास पाहिले अन् वायर रोप एटीएम मशीनला गुंडाळून मशीन बाहेर ओढले आणि स्कॉर्पिओ गाडीत ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. हा सर्व थरार फक्त पाच मिनिटांत घडला. यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या गाडीचा शोध घेण्यासाठी नाकेबंदी केली. पोलिसांची सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली होती; परंतु हे चोरटे स्कॉर्पिओ गाडीसह पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारे एटीएम चोरून घेण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एटीएम मशीनच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.