Pune : Lockdown नंतर बसला गर्दी वाढत असल्याने चोरटे पुन्हा सक्रिय; PMP बसमध्ये 2 वेगवेगळ्या चाेरीच्या घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपी बसने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका महिलेचा 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज पळविल्याचा प्रकार समोर आला आहे, तर आणखी एका महिलेचे 50 हजार रुपये बसमधून चोरीला गेले आहेत. लॉकडाउननंतर बसला गर्दी वाढत असल्याने चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. स्वारगेट ते विश्रांतवाडीदरम्यान ही घटना घडली आहे.
याबाबत 46 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला स्वारगेट ते विश्रांतवाडी बसने प्रवास करत होत्या. लॉकडाउननंतर आता बसमध्ये गर्दी होऊ लागली आहे. याचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या पिशवीतील मंगळसूत्र, दोन हजारांची रोकड, कागदपत्रे, डेबिट कार्ड असा १ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी माहिती घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक एस. पी. यादव या करत आहेत.

दरम्यान, दुसरी घटना हडपसर भागात घडली आहे. पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतील ५० हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला असून, स्वारगेट स्थानकातून त्या पीएमपी बसने हडपसरकडे निघाल्या होत्या.