Pune : दरोडयाच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जांभुळवाडी दरी पुलाजवळ ही कारवाई केली आहे. तर त्यांचे साथीदार पसार झाले आहेत.

संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे (वय 26), अमर नंदकुमार चव्हाण (वय 28) व अक्षय रवींद्र कांबळे (वय 24, सर्व रा. अप्पर बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे कर्मचारी सुशील जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

शहरात लुटमरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटना रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. गुन्हे शाखेच्या पथकांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी गुन्हे शाखेचे पथक माहिती घेताना जांभूळवाडी दरी पुलाच्याजवळील महामार्ग रस्त्यालगत काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजले. यानुसार तिघांना पकडण्यात आले. मात्र त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. तिघांकडून घातक हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. चौकशी केली असता त्यांच्याकडून ते या रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक बी. आर. कोते करत आहेत.