Pune : बांधकामाचे साहित्य चोरणार्‍या तिघांना अटक; हिंजवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   दुकानात ठेवलेले बांबू, वासे, विटासह बांधकामांचे इतर साहित्य चोरी करून बेकायदा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. संतोष कुंभार (वय ४४), राहुल अडगळे (वय २९), पवन बरडे (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. या प्रकरणी आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांचा अटकपूर्ण जामीन मंजूर केला आहे.

याबाबत ३४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. १८ ते २० डिसेंबर २०२० या दरम्यान भूमकर चौक परिसरात ही घटना घडली. हिंजवडी परिसरात असलेल्या फिर्यादी यांच्या दुकानात ठेवलेले तीन ट्रक बांबू, एक ट्रक वासे, तीन हजार वीटा, बांबू कटिंग मशिन, कोयता, हातोडी, खिळे चोरीला गेले होते. तसेच पाण्याचे मीटर, पाइप, नळ, सीसीटिव्ही कट करण्यात आले होते. चोरट्यांनी दुकानात खड्डे खांदून एकूण ६ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल चोरला. तसेच या जागेवर जीवन भुमकर नावाचा बोर्ड लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी तिघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी, गुन्ह्यातील वाहने जप्त करण्यासाठी, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.