Pune : अ‍ॅन्टी करप्शनची माणसं असल्याचं सांगत तिघांनी 77 वर्षीय नागरिकास भरदुपारी लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरदुपारी एका पादचारी नागरिकास तिघांनी अडवून आम्ही अँटिकरप्शनचे माणस असून, सोने घालून फिरू नका असे म्हणत लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कर्वेनगर भागात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 77 वर्षीय जेष्ठ नागरिकाने आलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्वेनगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान त्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. येथे ते आले होते. तेथील काम झाल्यानंतर ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास परत घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी मधु संचय गणपती मंदिरासमोर दोघांनी त्यांना अडवले. तसेच “लो हमारे सहाब उधर खडा है, साहब को मिलो तुमको मालूम नही क्या, सोना पहणके घुमना नही.” हम अँटिकरप्शन के लोग है, आपकी सुरक्षा के लिये है असे म्हणत त्यांच्या समोर एकाच्या थोबाडीत मारल्याचे नाटक केले. आणि त्यांना गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठी व घड्याळ काढून ठेवण्यास सांगितले.

त्यानंतर ते रुमालात ठेवायला घेऊन रुमालात ठेवल्याचे भासवत रुमालात फक्त घड्याळ ठेवले आणि हा रुमाल त्यांच्या पिशवीत ठेवला व त्यांना जाण्यास सांगितले. फिर्यादी यांनी काही अंतरावर गेल्यावर रुमाल पाहिला त्यावेळी त्यात फक्त घड्याळ असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास आलंकार पोलीस करत आहेत.