Coronavirus : पुण्यात आतापर्यंत ‘कोरोना’चे 18 बळी, बधितांची आकडा 197 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात बुधवारी एकाच दिवशी १० जणांचा मृत्यु झाला असून नवीन ३९ कोरोना बाधित आढळून आले आहे. आतापर्यंतचा एकाच दिवशी मृत्यु पावणारे आणि सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून येण्याचा ही पहिलीच घटना आहे. त्याचवेळी आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेले ३६ जण पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत़ ही एक दिलासा देणारी बाब आहे.

पुण्यात ३० मार्च रोजी पहिला कोरोना विषाणूचा बळी गेला होता. ५२ वर्षाच्या एका रुग्णावर उपचार सुरु असताना त्याने ३० मार्च रोजी खासगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला होता. त्यानंतर केवळ ८ दिवसात पुण्यातील कोरोना मृत्युची संख्या १८ वर पोहचली आहे. या मृत्युमुखी पडलेल्यांना अगोदरच अनेक व्याधी होत्या. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे. त्यामुळेच त्यांना कोरोनाची बाधा अगोदर होऊ शकली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यातील अनेक जण हे ज्येष्ठ नागरिक आहेत.

पुणे शहरात आतापर्यंत १६६ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ७ एप्रिलपर्यंत भवानी पेठ परिसरात सर्वाधिक ३६ रुग्ण असून भवानी पेठे पाठोपाठ धनकवडी भागात १३, कसबा व विश्रामबागवाडा परिसरात प्रत्येकी १०, शिवाजीनगर व येरवडा येथे प्रत्येकी ६, बिबवेवाडी -४, औंध बाणेर -३, ढोले पाटील रोड ३, हडपसर ५, कोथरुड २, नगर रस्ता २, वानवडी २, वारजे २ व इतर उपनगरात ६ रुग्ण आहेत.

शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्याचा समुह संसर्ग वाढू नये, म्हणून शहर पोलिसांनी ४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यु लागू केला आहे. वाढती संख्या लक्षात घेता पुढील काही दिवसात शहरात टप्प्या टप्प्याने कर्फ्यु वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले आहे.

You might also like