मुंबईवरून बंदोबस्त करून आलेल्या SRPF च्या 14 जणांना ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 20 पॉझिटीव्ह

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बंदोबस्तकरून आलेल्या रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) ग्रुप दोनच्या कंपनीमधील २० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांचे आज अहवाल आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर ३३ पोलिसांचे अहवाल येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक मुंबईत आहे. तो वाढतच आहे. पोलीस विभाग 24 तास काम करत आहे. त्याच्या मदतीस बंदोबस्त करण्यासाठी रामटेकडी येथील एसआरपीएफ दोनची एक कंपनी मुंबई येथे गेली होती. या कंपनीत ९० कर्मचारी आहेत. ही कंपनी घाटकोर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होती.

येथील 1 महिन्याचा बंदोबस्त केल्यानंतर नुकतीच (१९ मे) ही कंपनी पुण्यात आली आहे. त्यानंतर २१ मे रोजी या कंपनीतील काही पोलिसांना त्रास होऊ लागला. तर काहींना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे या कंपनीतील २० जणांचे सुरवातीला स्वॉब घेण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर मंगळवारी आणखी १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर राव नर्सिंग होम येथे उपचार सुरू आहेत. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर आणखी ३३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती ग्रुप दोनचे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिली.