Pune : 32 इंची TV फक्त साडेसात हजाराला देण्याच्या बहाण्याने व्यापार्‍याची 6 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला सायबर चोरट्यांनी 32 इंची TV फक्त साडे सात हजारात देण्याच्या बहाण्याने 6 लाख रुपयांना फसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन दिवसात या सायबर चोरट्यानी त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत.

याप्रकरणी 30 वर्षीय व्यवसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बिबवेवाडीत राहतात. त्यांचा होलसेल इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. ते होलसेल टीव्ही देखील विक्री करतात. दरम्यान त्याना 25 जानेवारी रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तसेच त्याने उत्तरप्रदेश येथील एका टीव्ही कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. ही कंपनी गाझियाबाद येथे असून, 32 उंची टीव्ही साडे सात हजार रुपयांना देऊ असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्यांना एका कंपनीचे लेटर हेड पाठवले. त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी 140 टीव्हीचे एकूण 6 लाख रुपये संबंधित आरोपीने दिलेल्या बँक खात्यात भरले. पण, त्यानंतर देखील त्यांना टीव्ही मिळाले नाहीत. तर पैसे परत देत नव्हता. यावेळी फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार 25 ते 28 जानेवारी या कालावधीत घडला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर या करत आहेत.