कौतुकास्पद ! घरात गाळ, विस्कटलेला संसार पण ‘त्यांना’ हे व्यावसायिक कुटुंब पुरवतंय घरचं जेवण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ढगफुटीसदृश पावसामुळे घराघरात ओढ्या – नाल्यांचे पाणी शिरले, गाळाने घर भरले, इतकेच काय कचराही वाहून आला. संसारोपयोगी साहित्य भिजले, नुकसान झाले. डोळ्यासमोर विस्कटलेला संसार पाहून सुन्न झालेल्या पुरबाधितांना आधार देण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचे कुटुंबीय सरसावले असून दोनवेळचे घरचं जेवण पूरग्रस्तांना पुरविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
Pune
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अरण्येश्वर, शिवदर्शन, टांगेवाला कॉलनी यासह परिसरातील पूरबाधितांना दोन वेळच्या जेवणासाठी उद्योजक ललितशेठ जैन (शिंगवी) यांच्या पुढाकारातून शहरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी श्री गुरु गौतम मुनी मेडिकल अँड चॅरिटेबल सेंटरच्या अरण्येश्वर येथील नियोजित नवीन डायलिसिस व चिकित्सा केंद्रातून कुटुंबियांसह घरचं जेवण उपक्रम सुरु करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवित आहेत.

पुराबरोबर वाहून आलेला गाळ आणि कचरा घरातून बाहेर काढून भिजलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी पुरग्रस्तांची धडपड सुरु असताना, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था श्री गुरु गौतम मुनी मेडिकल अँड चॅरिटेबल सेंटरद्वारे होत असल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. पुरी -भाजी , खिचडी, मसाले भात आदी खाद्य पदार्थ पूरग्रस्तांना पुरविले जात आहेत.
Pune
या उपक्रमात ललित जैन (शिंगवी) यांच्यासह जीवन बेद, मनोज छाजेड, सामाजिक कार्यकर्ते राहुल माने, गौतम गेलडा, राजेश सुराणा, अर्हम कोटेचा, प्रकाश संचेती, संतोष भुरट, दिनेश मुनोत, वैभव सेठिया, आशिष दुगड, राहुल सुराणा, मुकुल बरमेचा, महावीरजी, मुकेश छाजेड, राहुल बोगवत, श्रीपाल ललवाणी, सुनील शहा, किरण सुराणा, योगेश सुरतवाला, स्वाती गेलडा, प्रतिभा भुरट, अरुणा बनवट आदींसह अनेक व्यावसायिकांचे कुटुंबीय परिश्रम घेत आहेत.

या उपक्रमात महापालिकेचे जे कर्मचारी पूरग्रस्त भागात स्वच्छता करीत आहेत. त्यांच्यासाठीही भोजन पुरविले जात आहे. राहुल माने यांच्या देखरेखीखाली विजय बिबवे आणि सहकारी हे पूरग्रस्त वसाहत, सॊसायट्यांमध्ये भोजन वितरित करण्याचे काम करीत आहेत. या उपक्रमात मदतीसाठी सहभागी होण्यासाठी अरण्येश्वर येथील श्री गुरु गौतम मुनी मेडिकल अँड चॅरिटेबल सेंटरच्या नियोजित डायलिसिस सेंटर येथे संपर्क साधावा, असे आवाहन ललितशेठ जैन (शिंगवी) यांनी केले आहे.

Visit : policenama.com