Pune : वखार महामंडळ चौकातील Y आकाराच्या पुलाला व्यापार्‍यांचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महापालिकेने मार्केटयार्ड येथील वखार महामंडळाकडून नेहरू रस्ता आणि शिवनेरी रस्त्याकडे जाण्यासाठी वाय आकाराच्या पुलाचे नियोजन केले आहे. विशेषत: शिवनेरी रस्त्याकडे वळणार्‍या पुलामुळे भविष्यात वाहतूक कोंडी आणि अपघातासोबतच या रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यापार्‍यांना व्यवसाय बंद करावे लागणार आहेत. या पुलाला व्यापार्‍यांनी विरोध केला असून महापालिकेने या पुलाचे काम करू नये, अशी मागणी केली आहे अशी माहिती पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गरड यांनी सांगितले, कीमार्केटयार्ड भुसार बाजारातील शास्त्री रस्ता आणि समोरील शिवनेरी रस्त्याची मालकी पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीची आहे. नागरिकांना सोयीचे ठरावेत म्हणून ते वापरासाठी महापालिकेकडे मेन्टेंनन्ससाठी देण्यात आले आहेत. महापालिकेने या रस्त्यावर वखार महामंडळाकडून शिवनेरी रस्त्यावर उजवीकडे वळण्यासाठी तसेच सरळ जाण्यासाठी नेहरू रस्त्यावरून वाय आकाराच्या पुलाचे नियोजन केले आहे. या कामाची वर्क ऑर्डरही संबधित ठेकेदाराला देण्यात आली आहे. या उड्डाणपुला संदर्भात व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. या उड्डाणपुलाचे काम करू नये, अशी निवेदनेही यापुर्वी महापालिकेला देण्यात आली आहेत. व्यापार्‍यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर महापालिकेच्या अभियंत्यांनाही प्रत्यक्ष जागा पाहाणी करण्यास सांगितले आहे.

सोलापूर रस्त्याने नेहरू रस्ता मार्गे मोठी वाहने शेती व भुसार माल घेउन बाजारात येतात. वखार महामंडळाच्या चौकामध्ये वाय आकाराचा पुल उभारल्यास मोठी वाहने वळण्यास अडचण होणार आहे. तसेच या दोन्ही रस्त्यांच्या कडेल जवळपास २० हून अधिक दुकाने आहेत. उड्डाणपुल झाल्यास या मोठ्या वाहनांतील माल दुकानांमध्ये उतरवून घेणे देखिल जवळपास अशक्य आणि अपघातांना निमंत्रण देणारे ठरणार आहे. यासाठी वखार मंडळापासून नेहरू रस्त्यावर पीएमटी डेपोपर्यंत किंवा गंगाधाम चौकाच्या पुढपर्यंत उड्डाणपुल बांधावा. मात्र, शिवनेरी रस्त्यावरील पुलाच्या आर्मचे काम करू नये, अशी व्यापार्‍यांनी मागणी केली आहे.

यासंदर्भात महापालिकेतील अधिकारी, स्थानीक नगरसेवकांशी देखिल चर्चा करणार असून पालकमंत्र्यांना विनंती करणार असल्याची माहिती गरड यांनी दिली.