ज्ञानेश्वर पादूका चौक ते वीर चाफेकर चौकापर्यंतचा ‘दुहेरी’ वाहतूक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – ज्ञानेश्वर पादूका चौक ते वीर चाफेकर चौकापर्यंतचा रस्त्या आता दुहेरी वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने शुक्रवारी दुहेरी वाहतूकीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.

शिवाजीनगर वाहतूक विभागाने 2008 मध्ये हाॅटेल ललितमहल ते ज्ञनेश्वर पादुका चौकपर्यंत डाव्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू केली होती. त्याप्रमाणे वीर चाफेकर चौकाकडून ललितमहल हॉटेलकडे जाण्यासाठी प्रवेश बंद होता.

त्यामुळे शिवाजीनगर परिसरात सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तत्पुर्वी न.ता.वाडी, पाटील इस्टेट, मॉडेल कॉलनी तसेच विद्यापीठ रोडने फर्ग्युसन कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्यावर प्रवेश बंदी होती. त्यामुळे वाहन चालकांना संचेती ते स.गो.बर्वे चौकातून जावे लागत असे. यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत होती. त्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर शिवाजीनगर वाहतूक विभागाने याचा अभ्यास केला. त्यावेळी गैरसोय दुर करण्यासाठी वाहतूक विभागाने वीर चाफेकर चौक ते ज्ञानेश्वर पादूका चौकापर्यंतचा रस्ता दुहेरी वाहतूकीसाठी खुला केला आहे.

दरम्यान, याबाबत नागरिकांच्या काही हरकती असल्यास त्या वाहतूक विभागाकडे लेखी किंवा प्रत्यक्ष येऊन द्याव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.