पुण्यातील FC रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौक ते वीर चाफेकर चौकादरम्यानच्या दुहेरी वाहतूकीस स्थगिती, 5 दिवसात निर्णय बदलला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एफ.सी. रस्त्यावरील संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक ते वीर चाफेकर चौक (कृषी महाविद्याालय, म्हसोबा गेट) सुरू करण्यात आलेली दुहेरी वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. वाहतूक शाखेकडून याबाबत आदेश देण्यात आला आहे. स्मार्टसिटी अंतर्गत ललित महल चौक ते म्हसोबा गेट चौकादरम्यान पदपथाचे काम सुरू असल्याने दुहेरी वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ही वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. पाच दिवसांमध्येच पोलिसांना हा निर्णय बदलावा लागणार आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत आणि वाहतूकीचा वेग वाढविण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातही मध्यवस्थी व काही प्रमुख भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दिवसेंदिवस त्यात भर पडत असल्याने पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
एफ.सी. रोडवर संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक ते वीर चाफेकर चौक दरम्यान दुहेरी वाहतूक सुरू केली होती. गुरुवारी (27 फेब्रुवारी) हा निर्णय घेतला होता. याबाबत काही हरकती किंवा काही म्हणने असेल तर ते कळविण्याचे आवाहन देखील केले होते. तत्पुर्वी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ललित महल हॉटेल चौक ते वीर चाफेकर चौकापर्यंत उजव्या बाजूला पदपथाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्याची रूंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

सकाळी आणि सायंकाळच्या वेळी एफ.सी रस्त्यावर मोठी वाहतूक असते. त्यात दहावीची परीक्षा मंगळवारपासून (3 मार्च) सुरू होणार आहे. बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. वीर चाफेकर चौकातून संत श्री ज्ञानेश्वर महाराज चौकाकडे जाणार्‍या वाहनांना जागा उपलब्ध होत नसल्याने दुहेरी वाहतूक तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.
दुहेरी वाहतूक योजना सुरू केली. पण, पदपथाचे काम सुरू असून यामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे. पाच दिवसात वाहतुकीचे नियोजन करत असताना काही त्रुटी असल्याचे लक्षात आले. यामुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.