पुण्यात एकाच दिवसात वाहतूक पोलिसांनी ठोठावला 30 लाखांचा ‘दंड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या वर्षात वाहतूक विभागाने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी कंबर कसली असून, केवळ एका दिवसात विशेष मोहिम राबवून तब्बल 8 हजार कारवाईंत 30 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दंडाचा आकडा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. सुशोभीकरण, वेगवेगळी कामे आणि वाढती वाहन संख्या यामुळे वाहतूकीचा बोजवारा उडलेला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभाग अनेक प्रयत्न करत आहेत. परंतु, त्याचा काही परिणाम पडत नसून पुणेकर वाहतूक कोंडीने मेटाकुठीला आले आहेत.

वाहतूक पोलिसांनी मात्र गेल्या काही महिन्यात बेशिस्तांवर जोरदार कारवाईचा धडाका सुरू केला आहे. चौकात न उभरता चौकापासून काही अंतर उभे राहून सावज शोधण्यात मग्न आहेत. शहरात हे चित्र पाहायला मिळत असून, एकीकडे वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांची सुटका करण्यापेक्षा कारवाईवरच भर दिला जात आहे. त्यातही हेल्मेट कारवाई सध्या पोलिसांची अगदीच आवडतीची गोष्ट बनली आहे. गेल्या वर्षात तब्बल 82 कोटींचा दंड केवळ हेल्मेटच्या कारवाईतून जमा करण्यात आला आहे. त्यामुळे इतर कारवाईचा आकडा यात मिळविल्यास तो दिडशे कोटींहून अधिक होत आहे.

वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा पोलीस अपघात टाळण्यासाठी म्हणून विशेष मोहिमा राबवत केवळ कारवाईकडे लक्ष देत असल्याचे दिसत आहे. वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे या कारवाया सुरू असल्याचे काहीजण खासगीत सांगत आहेत.

दरम्यान, पोलीसांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात (दि. 5 जानेवारी) शहरातील 24 विभागाअंतर्गत विशेष मोहिम राबवून बेशिस्त वाहन चालकांसोबतच हेल्मेट परिधान न केलेल्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी यात जवळपास 8 हजाराहून अधिक वाहन चालकांवर कारवाईकरून 30 लाखांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे येणार्‍या कालावधीतही ही कारवाई तीव्र करून दंड ठोठावला जाणार असल्याचे सांगितले जाते.

प्रकार              (केसेस)               दंड
नो-पार्किंग        (2101)             420400
विना हेल्मेट      (3866)            1933000
झेब्रा क्रॉसिंग    (699)               139800
सिग्नल जंपीग    (632)               126400
राँग साईड         (179)                179000
विना सिटबेल्ट   (140)               28000
ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसणे   (892)  178400
कॅब, टॅक्सी ड्रायव्हर विना युनिफॉर्म  (124)  24800

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/