हे आहेत टॉप बेशिस्त 100 पुणेकर, ज्यांनी तोडले अनेक वाहतुकीचे नियम… जाणून घ्या तुमचे तर नाव नाही ना ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलीसांनी कंबर कसली अन् गेल्या वर्षात तब्बल 111 कोटींचा दंड ठोठावला… पण, त्यानंतरही बेशिस्तांची कमी नसल्याचे दिसत असून, टॉप शंभर बेशिस्त वाहन चालकांची यादी पोलीसांनी तयार केली आहे. सर्वाधिक 108 केस असलेल्या वाहनचालकापासून सर्वात कमी 44 केसेस असलेल्या चालकांचा समावेश आहे.

शहरातील वाहतूक सुरक्षित, सुरळीत चालविण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील आहे. वेगवेगळ्या उपाययोजनांसोबतच कारवाईचाही बडगा उगारला जात आहे. बेशिस्तांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. दोन्ही पातळीवर पोलिसांकडून काम करण्यात येत आहे. पण, या बेशिस्तांना शिस्त लागत नसल्याचेही दिसत आहे. हेल्मेट कारवाई तीव्र केल्यानंतर शहरातील हेल्मेट परिधान करणार्‍यांची संख्या वाढली. पण, पोलिसांनी या कारवाईतून केवळ एका वर्षात तब्बल 111 कोटींचा दंड ठोठावला. पुण्यातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, इतके उपायकरूनही बेशिस्तांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. पोलीसांकडून ‘इ-चलन’ मशिनद्वारे आणि ‘सीसीटीव्ही’द्वारे कारवाई केली जात आहे. कारवाईची माहिती संबंधितांना ‘एसएमएस’द्वारे पाठविली जाते. त्यांनी तो दंड ऑनलाईन भरणे अपेक्षित असते; परंतु बर्‍याचदा वाहन चालकांचा कल दंड न भरण्याकडे असतो. अशा प्रकारे दंड प्रलंबित असलेल्या वाहन चालकांची संख्या अधिक आहे. जवळपास निम्याहून अधिक दंड पेंडीग असल्याचे समोर आले आहे.

हा दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वाधिक केसेसचा दंड प्रलंबित असलेल्या शंभर जणांची यादी प्रसिद्ध केली आहे.

येथे तपासा ऑनलाइन दंड
वाहतूक पोलिसांनी केलेला दंड तपासण्यासाठी https://mahatrafficechallan.gov.in मोबाईल अ‍ॅपवर माहिती तपासता येणार आहे. ही माहिती तपासण्यासाठी वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि इंजिन क्रमांक किंवा चॅसिस क्रमांकाची शेवटचे चार आकडे गरजेचे असतात.