पुण्यात आता वाहतूक विभागातील परवानग्या ‘ऑनलाइन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतूक विभागातर्फे दिल्या जाणारे परवाने ऑनलाईन दिले जाणार आहेत. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते या ऑनलाईन उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी झाला. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे, वाहतूक विभागाचे प्रशासन अधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.

शहरात पालिका व विविध संस्थाकडून विविध विकासकामे करण्यात येतात. त्यावेळी त्यांना वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यामध्ये रस्ते खोदाई, वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांची केबल टाकण्याचे कामे असतात.

या सर्वांना कामकाजासाठी वाहतूक विभागाकडे जावे लागत होते. नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी वाहतूक विभागाने “पुणे एनओसी डॉट इन” नावाची वेबसाईट तयार केली आहे. त्याद्वारे नागरिकांनी येथे माहिती भरायची आहे. माहिती पूर्ण दिसल्यानंतर तीन दिवसानी ऑनलाईन परवानगी दिली जाणार आहे. त्यामध्ये तीन महिन्यांपर्यंत कामकाजाचा समावेश करण्यात आला आहे. कामाचा कालावधी जास्त असल्यास संबंधित विभागाची दर आठवड्याला बैठक घेउन आढावा घेतला जाणार आहे.

वाहतूक विभागाकडून सर्व परवानग्या ऑनलाईन करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक विभागाकडून करण्यात येणारी मद्यपी वाहनचालकांविरुद्धची कारवाई बंद करण्यात आली आहे. या कारवाईत ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी केली जाते. या कालावधीत ही कारवाई धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, बेशिस्त वाहनचालक आणि मद्यपी वाहनचालकांनी गैरफायदा घेतल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

कोट- वाहतूक विभागाकडून सर्व परवानग्या ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन तीन दिवसांत एनओसी दिली जाईल.
डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग