Pune Traffic Police – PMC Water Supply | ‘जड वाहतूक’ या शिर्षकाखाली वाहतूक पोलिसांची ‘पाण्याच्या टँकर्स’वर कारवाई ! पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने उपनगरातील नागरिकांकडून संताप व्यक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police – PMC Water Supply | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील जड वाहतुकीला बंदी घालण्याचे वाहतूक पोलिसांनी भलतेच मनावर घेतले आहे. परंतू याचा सर्वाधिक फटका हा पाणी पुरवठा करणार्‍या टँकर्स वाहतुकीला बसला आहे. पोलिसांनी अलिखित आदेश देत दुपारी १ ते ५ आणि रात्री १० ते सकाळी ६ या वेळेव्यतिरिक्त शहराच्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठा करणार्‍या टँकर चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याने टँकर चालकांसोबतच पाणी टंचाई असलेल्या भागातील नागरिकांचेही हाल सुरू झाले आहेत. (Pune Traffic Police – PMC Water Supply)

 

शहरामधील वाहतूक कोंडीला रस्त्यांवरील खड्डयांसोबतच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष देखिल कारणीभूत असल्यावरून पावसाळ्यातील चार महिने पोलिस विरुद्ध महापालिका प्रशासन असा कलगीतुरा रंगला होता. तत्कालीन वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची कार्यपद्धती याला कारणीभूत असल्यावरून प्रामुख्याने टीका झाली होती. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याची गंभीर दखल घेत श्रीरामे यांच्या विभागाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एका उपायुक्तांची नियुक्ती केली होती. तर शहरातील उपायुक्तांच्या बदल्यानंतर नवीन आलेल्या उपायुक्तांना पहिले काही दिवस शहरातील वाहतूक प्रश्‍नावरच अभ्यास करण्यास सांगितले. यानंतरच उपायुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून शहरांत जड वाहनांवरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार मागील काही दिवसांपासून कार्यवाही सुरू आहे. (Pune Traffic Police – PMC Water Supply)

दरम्यान, वाहतूक पोलिस शाखेने नुकतेच दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा असलेल्या पाण्याच्या टँकर्सवरच कारवाई सुरू केल्याने गोंधळ उडाला आहे. विशेष असे की जडवाहतुकीमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असतानाही पाण्याच्या टँकरवरील कारवाईमुळे बोंबाबोंब सुरू झाली आहे. विशेषत: शहरातील उपनगरांमध्ये रात्री- अपरात्री टँकरने मिळणार्‍या पाण्यासाठी जागावे लागत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. सकाळी ६ ते १ आणि संध्याकाळी ५ ते १० जेंव्हा पाण्याची अत्यंत गरज असते, त्याचवेळी टँकर येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात काही टँकरचालकांशी संपर्क साधला असता दुपारी १ ते ५ आणि रात्री १० ते सकाळी ६ या वेळे व्यतिरिक्त उर्वरीत वेळेत टँकर रस्त्यावर आणल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. २९ नोव्हेंबरपासून पोलिसांनी टँकरवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याने पाणी वाहतूक परवडत नसल्याने नाईलाजास्तव टँकर उभे ठेवावे लागतात. पोलिसांच्या वेळेत टँकर पोहोचवायचे झाल्यास टँकर भरणा केंद्रांवर रांगा लागत असून एखाद दुसरीच खेप घालावी लागते. यामुळे देखिल नागरिकांच्या तक्रारी वाढल्याची माहिती या टँकर चालकांनी दिली.

 

प्रामुख्याने बाणेर, बालेवाडी, पर्वती, हडपसर, मुंढवा, उरूळी देवाची, फुरसुंगी या भागात मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा होतो. शहरात महापालिकेची सात ठिकाणी टँकर भरणा केंद्र असून येथून दररोज एक हजार टँकरच्या फेर्‍या होतात. एवढी प्रचंड मागणी आहे. पोलिसांच्या वेळेच्या बंधनामुळे हे वेळापत्रक बिघडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टँकरच्या वेळांबाबत नागरिक आणि टँकर चालकांकडूनही मागील दोन दिवसांत तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे.
पाणी पुरवठा ही अत्यावश्यक बाब असून टँकरला जड वाहतुकीतून वगळावे यासाठी वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्याशी संपर्क साधला आहे.

 

– अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका.
(Aniruddha Pawaskar PMC)

 

पाण्याची टँकर सेवा अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत.
मात्र सिमला ऑफीस ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे.
याठिकाणी वाहतूक कोंडी होउ नये यासाठी गर्दीच्यावेळी टँकर जावू नयेत, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. परंतू यावर कुठलेही निर्बंध घातलेले नाही.

 

– विजय मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
(Vijay Magar, DCP Traffic, Pune)

 

 

Web Title :- Pune Traffic Police – PMC Water Supply | Under the heading of heavy transport, traffic police pune action on water tankers in upnagar ! Residents of suburbs express anger as water supply is disrupted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

Gujarat Election 2022 | नवसारी येथे भाजप उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai High Court | ‘राज्यपाल कोश्यारींना हटवा’, मागणी करणार्‍या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय