Pune : वृक्षवल्ली वाढविण्याचा विडाच उचलण्याची गरज – कॅन्टोन्मेंट हास्य क्लबचे विभागप्रमुख प्रकाश अरगडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल महिन्यापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय नव्हे, तर खासगी रुग्णालयांमध्येही बेड आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे, ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडून मृत्यूमुखी पडत असल्याच्या बातम्या धडकत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाबरोबर नातेवाईकांच्या हृदयाची धडधड वाढू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. आता तरी नागरिकांनी सावध होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्याचा वसा घेऊन वृक्षवल्ली वाढविण्याचा विडा उचलला पाहिजे, असे मत कॅन्टोन्मेंट हास्य क्लबचे विभागप्रमुख प्रकाश अरगडे यांनी व्यक्त केले.

जागतिक हास्य दिनाचे औचित्य साधून आज (रविवार, दि. 2 मे) भैरोबा नाल्यावरील सोपानबाग येथे ग्रीन थम्बने विकसित केलेल्या सोपानबाग पार्क (देवराई) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. ठाकूर, साधना बँकेचे माजी संचालक चंद्रकांत कवडे, सुशिला अरगडे, प्रकाश फुलवरे आदी उपस्थित होते.

अरगडे म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण मानसिक ताणतणावामध्ये त्यातून मुक्तता मिळावी, सकारात्मकता प्रत्येकामध्ये निर्माण झाली पाहिजे. या भावनेतून आज जागतिक हास्यदिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मागिल अनेक वर्षांपासून पर्यावरणप्रेमी वृक्ष लावा, संगोपन करा, नैसर्गिक ऑक्सिजन मिळवा, असे घसा तोडून सांगत होते. मात्र, मानवाने हव्यासापोटी डोंगराचे लचके तोडले, जुनी मोठी वृक्षवृल्ली तोडली आणि त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. मागिल वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. दिवाळीच्या दरम्यान कोरोना काही अंशी कमी झाला होता.

मात्र, पुन्हा मागिल दोन महिन्यांपासून कोरोनाचा ज्वर वाढला आणि कोरोनाबाधितांचा आकडा भस्मासूरासारखा वाढू लागला. त्यामुळे रुग्णालयामध्ये बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर बेड आणि ऑक्सिजन मिळत नाही, अशी अवस्था निर्माण झाली. निसर्गाने भरभरून दिले आहे, त्यामध्ये वाढ करण्याऐवजी मानवाने त्याची मोठ्या प्रमाणात हानी केली, त्यामुळे आता ऑक्सिजन पार्क उभारण्याची वेळ आली आहे. आता प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.