पुणे मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ भुयार आढळलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात सध्या मेट्रोचं काम सध्या वेगाने सुरु आहे. हे काम सुरु असताना स्वारगेटजळं एक भुयारी मार्ग आढळला आहे. 12 ते 15 फुटांवर हे भुयार सापडलं आहे. स्वारगेटला मल्टीमोडल हब उभारणीचं काम जोरात सुरु आहे. त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु आहे. हे खोदकाम सुरु असतानाच हे भुयार समोर आलं आहे.

स्वारगेट ते शिवाजीनगर येथील अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजसाठी मेट्रोच्या भुयारी मार्गाचं काम सुरु होतं. यावेळी पायलिंग मशीनच्या मदतीने जमिनीमध्ये खड्डा खोदण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असताना बस स्टॉप जवळची जमीन अचानक खचल्याचे दिसून आले. यावेळी सुमारे 8 ते 10 फुटांचा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्यात उतरून तेथील पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना हा भुयारी मार्ग आढळून आला. पूर्व आणि पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचं त्यांना आढळून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, या भुयाराचं बांधकाम पाहता हे भुयार 30 ते 35 वर्ष जुनं असल्याचा अंदात अभियंत्यांनी वर्तवला आहे. दगडी बांधकाम असणारं हे भुयार 50 ते 60 मीटर लांबीचं असावं असं सांगितलं जात आहे. परंतु हे भुयार नेमकं कधी बांधण्यात आलं याची मात्र खात्रीशीरपणे माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, भुयारं सापडल्यानंतर मेट्रोचं काम थांबवण्यात आलं आहे.

यापूर्वीही पुण्यात असाच एक भुयारी मार्ग सापडला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ब्रिटीशकालीन भुयारी मार्ग सापडला होता. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत हा भुयारी मार्ग आहे.