कोंढव्यातील ‘बंटी’चा खून ‘भाईगिरी’तून, मारेकर्‍यांचा ‘पर्दाफाश’ करत पोलिसांनी घेतलं दोघांना ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोंढवा भागात घडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले असून, केवळ गल्लीत “भाईगिरी” करत असल्याचा रागातून त्याला संपविण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या डोक्यात वारकरून त्याला ठार मारले होते. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना पकडले आहे.

योगेश सुधाकर कांबळे (वय 23) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी पकडले आहे. अक्षय उर्फ बंटी सुरुज गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, अक्षय उर्फ बंटी हा येवलेवाडी भागात राहण्यास आहे. तो मिळेल ते काम करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तर आरोपीही त्याच परिसरात राहणारे आहेत. त्यांची ओळख होती. दरम्यान अक्षय हा गल्लीत तसेच येथील मुलांवर “भाईगिरी” करत असे. याचा राग आरोपींच्या मनात होता.

शुक्रवारी रात्री तिघेही एकत्र पार्टी करण्यास गेले. मद्यपान केल्यानंतर आरोपीनी त्याच्या डोक्यात लाकडाने मारून त्याचा निर्घृण खून केला. तसेच तेथून पसार झाले.

शनिवारी सकाळी हा प्रकार समोर आला. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात व्यक्ती पडल्याचे पाहून नागरिकांनी  पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यांनतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती घेतल्यानंतर तो बंटी गायकवाड असे नाव असल्याचे समोर आले. त्यानूसार पोलिसांनी आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली. आरोपी सोलापूर रस्त्याने गेल्याचे समजल्यानंतर कोंढवा पोलिसांनी त्यांना सायंकाळी या भागातून ताब्यात घेतले.