Pune : अपहरण करून अभियंता महिलेला लुटणाऱ्या दोघांना दिल्लीत केले जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   संगणक अभियंता महिलेला कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटल्याप्रकरणी शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने दिल्लीत जेरबंद केले.

राजेश सिंग माही (वय ३९, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि कृष्णा रामबहादूर राणा (वय ३०, रा. महिपालपूर, दिल्ली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस पथक दोन्ही आरोपीला घेऊन पुण्याकडे निघाले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी दिली.

कोंढव्यामध्ये महिलेला लुटल्यानंतर आरोपींनी कॅबने मुंबई गाठली. त्यानंतर तेथून विमानाने त्यांनी दिल्ली गाठली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या मागोमाग पुणे पोलिसांचे पथकही विमानाने दिल्लीत पोहाेचले. तेथे जाऊन शुक्रवारी पोलिसांनी दोघांनाही पकडले.

राजेश सिंग हा स्टडफार्म येथे काम करण्याबरोबरच गाडी चालविण्याचे काम करतो. त्याचा साथीदार हा मूळचा दिल्लीतील राहणार असून, त्याचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे.

गाडी शिकविण्यासाठी येऊन या दोघांनी मंगळवारी सकाळी साडेआठ ते दहा वाजण्याच्या सुमारास पिसोळी येथे नेऊन तिला गाडीच्या सीटला बांधले. महिलेच्या हातातील अंगठ्या कटरने कापून घेतल्या तसेच गुगल पे व एटीएम कार्डमधून जबरदस्तीने पैसे काढून १ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना युनिट ५ च्या पथकाने या दोघा आरोपींना पकडले आहे.