Pune : मोबाईल टॉवरवरील 3 G व 4 G नेटवर्कचे बेस बँड चोरी करणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातल्या मोबाईल टॉवरवरील थ्री जी व फोर जी नेटवर्क कव्हरेज करणारे बेस बँड चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. तर त्यासोबत भंगार विक्री करणार्‍याला देखील पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून 61 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सुफरान लतीब राज उर्फ बाबा (40, रा. सय्यदनगर, हडपसर मुळ रा. कासमनगर, उरण, रायगड) व महेश हनुमंत परिट (24, रा.चिंतामणीनगर, हडपसर मुळ रा. उत्तर सोलापूर) आणि भंगार विक्रेता समीरउल्ला अजीमउल्ला शहा (29, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेस बँडच्या चोरीचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट दोनचे पथक करत होते. यादरम्यान पोलिस उपनिरीक्षक ए. डी. पिंगळे यांना मोबाईल टॉवरवरील स्पेअरपार्ट चोरी करणारे दोन जण दुचाकी घेऊन स्वारगेट एसटी स्टँडजवळील कॅनॉलरोड थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शहर, ग्रामीण, व पिंपरी-चिंचवड हद्दीतून अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुल केले. तसेच त्यांनी चोरी केलेले बेस बँड त्यांनी भंगारात विकल्याचे सांगितले. त्यानुसार सय्यदनगर येथील भंगार विक्रेता समीरउल्ला अजीमउल्ला शहा याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाईल टॉवर वरील थ्री जी आणि फोर जी नेटवर्क कव्हरेज कन्ट्रोल करणारे 6 बेस बँड, 11 रूस कार्ड, दोन टीआरएक्स असा 60 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातकडी दोन, चिखली, विमाननगर, लोणीकंद, शिक्रापूर येथील दोन, शिरूर, दौंड, लोणीकाळभोर, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. त्यांच्याकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक पिंगळे, कर्मचारी यशवंत आंब्रे, किशोर वग्गु, चंद्रकांत महाजन, निखील जाधव, विशाल भिलारे, चेतन गोरे, अजित फरांदे, कादीर शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.