Pune : खाद्य तेलाचे डबे चोरणार्‍या दोघांना आळेफाटा पोलिसांकडून अटक,

आळेफाटा : पोलीसनामा ऑनलाइन – गोडावूनचे शटर उचकटून दुकानातील खाद्य तेलाचे डबे चोरून नेणाऱ्या दोघांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 16 मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली होती. स्वस्त दरात तेलाची विक्री करत असताना पोलिसांनी आरोपींना अटक केली.

सिद्धेश तान्हाजी निघोट (वय-19 रा. आळे ता. जुन्नर) आणि विकास चांगदेव सोनवणे (वय-19 रा. चाळकवाडी ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर सावळेराम पाडेकर (रा. संतवाडी, ता. जुन्नर) यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा गोडाऊनचे शटर उचकटून आतमधील खाद्य तेलाचे डबे चोरून नेले. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस नाईक विकास लोंढे यांना माहिती मिळाली की, दोघेजण स्वस्त दरात तेलाची विक्री करत आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी इतर दोन साथिदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तेलाचे डबे आणि तेलाच्या विक्रीतून मिळालेले पैसे जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.ए. पवार, पोलीस नाईक विकास लोंढे, पोलीस नाईक लहानु बांगर, पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रतिप गर्जे, संजय शिंगाडे यांच्या पथकाने केली.