पुण्यातील ‘सलून’ व्यवसायिकाला खंडणी मागणारे दोघे अटकेत

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सलून व्यवसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत पाच हजारांची खंडणी मागितल्याची घटना घडली. अल्पवयीनासह एकाला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री आठच्या सुमारास मांजरीमध्ये घडली.

मुस्तकीम उर्फ मुस्ताक सादिक शेख (वय १८, रा. महादेवनगर, मांजरी) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सलून व्यवसायिकाच्या भावाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी परिसरातील महादेवनगरमध्ये फिर्यादी तरुणाच्या भावाचे सलूनचे दुकान आहे.

दोन दिवसांपुर्वी रात्री आठच्या सुमारास मुस्तकीम सलून दुकानात जाउन फिर्यादीच्या भावाकडे पाच हजारांचा हप्ता मागितला. मात्र, सलून व्यवसायिकाने हप्ता दिला नाही. त्याचा राग आल्यामुळे मुस्तकीमने दगड मारुन सलून दुकानाची काच फोडत त्यांना मारहाण केली. त्यानंतर हवेत कोयता फिरवून परिसरातील दुकानदारांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे अधिक तपास करीत आहेत.