लुटमार अन् 2 खून करणारा रिक्षाचालक, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सराईत गुन्हेगारांच्या चेकींग मोहिम राबविण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या महत्वकांक्षी क्रिप्स योजनेचा बोजवारा उडाला असून, दोन खून करणारा सराईत गुंडच मध्यरात्री रिक्षा चालवून लुटमार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दोघांनी एका मेडिकल स्टुडंटचे अपहरणकरून लुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शहरातील लुटमारीच्या घटनांनी पुणेकर भयभित झाले असून, दिवसेंदिवस या घटना वाढतच चालल्या आहेत.

फकिरा रामदत्ता शर्मा (वय 30, रा. नागपुर चाळ, येरवडा) आणि खुर्शिद शमशेद अन्सारी (वय 28, रा. वडारवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कात्रज परिसरात राहणार्‍या 23 वर्षीय तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फकिरा शर्मा हा येरवडा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर 2010 आणि 2012 मध्ये खूनाचे गुन्हे दाखल आहेत. तर, इतर तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये तो सध्या जामीनावर आहे. दरम्यान, तो शहरात प्रवाशी रिक्षा चालवत आहे. त्यातही मध्यरात्रीच रिक्षा चालवत आहे. त्याच्या रिक्षात कोयत्यासारखे घातक हत्यार त्याने ठेवले होते. तेही पोलिसांच्या हाती यावेळी लागले आहेत. त्यामुळे तो खुलेआम रिक्षा घातक शस्त्र बाळगून फिरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

दरम्यान, यातील फिर्यादी तरुण एका नामांकित महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. तो राहण्यास कात्रज परिसरात आहे. कामानिमित्त दुचाकीवर तो दोन दिवसांपुर्वी रात्री मध्यवस्थीत आला होता. रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी रोडने जात होता. त्यावेळी फकिरा आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या दुचाकीला रिक्षा अडवी लावली. त्याला थांबवून त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. त्याला धमकावत रिक्षात बसविले आणि त्याचे अपहरण करून निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी त्याचा मोबाईल काढून घेत त्याला 5 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याच्याजवळ पैसे नव्हते. पैसे न दिल्यास तुला खल्लास करेन अशी धमकी आरोपींनी दिली. त्यामुळे तो पुर्णपणे भयभित झाला. मात्र, नशिबाने अचानक तेथे फरासखाना पोलिसांची रात्र गस्तवरील पोलीस आले. त्यामुळे तो पटकन रिक्षातून बाहेर पडला आणि त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या रिक्षाची झडती घेतली असता कोयता, लोखंडी हत्यारे मिळून आली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते लुटमार करत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी दोघांचे रेकॉर्ड तपासल्यानंतर फकिरा येरवडा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या क्रिप्स योजनेचा बोजवारा उडल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. नेमके पोलीस कुठे गुन्हेगार चेकिंग करत आहेत आणि त्याची माहिती नमेकी काय भरत आहेत, असाही प्रश्न यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. नव्याचे नऊ दिवस असेच काही सध्या पुणे पोलीस दलात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –