Pune : तात्पुरत्या कारागृहातून 2 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह बद्यांचे पलायन

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – येरवडा परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून “कोरोना पॉझिटिव्ह” दोन बद्यांनी पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान हे तात्पुरते कारागृह म्हणजे बद्यांना पळून जाण्याच हक्काच ठिकाण झालं आहे. यापूर्वी देखील काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या कलम 394 सह इतर कलमान्वे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला पकडले होते. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तर दुसऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो कारागृहात होता.

दोघेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या येरवडा येथील तात्पुरते कारागृहाच्या बिल्डिंग क्र 104 मधील पहिल्या मजल्यावर होते. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेऊन उपचार देखील सुरू होते. मात्र मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास दोघेही या कारागृहातून पसार झाले आहेत. येथील गस्तीवरील कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ येरवडा पोलिसांशी संपर्क साधला. येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून निगडी व शिक्रापूर पोलीस ठाण्यांना माहिती दिली आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.